गुरूजनांनीच फासला पेशाला काळीमाः नराधमांच्या मुसक्या आवळणे हीच विजयाला खरी श्रध्दांजली : कुमार कडलग

गुरूजनांनीच फासला पेशाला काळीमाः नराधमांच्या मुसक्या आवळणे हीच विजयाला खरी श्रध्दांजली

 

 

(काटेवाडीचे खुनी ) कुमार कडलग :
गुरूजनांना मानवंदना देण्यासाठी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन उत्साहाने साजरा केला जातो,आपल्याकडे शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा अलिकडची असली तरी गुरू शिष्य परंपरेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.गुरूकुल परंपरेपासून आजच्या डिजीटल प्रणालीतही गुरूचा आदर यत्किंचतही कमी झाला नाही.अर्थात नेहमी सारख इथंही नियमाला अपवाद आहेच.आणि या अपवादाला नाठाळ प्रवृत्तीचे गुरूच जबाबदार आहेत,हेच काटेवाडीच्या त्या दुर्दैवी घटनेतून ध्वनीत होते.आपल्या सहकारी महिला शिक्षिकेचा मानसिक छळ करून, शिक्षक दिनी भर प्रार्थना सभेत विद्यार्थी आणि सह शिक्षकांसमोर अवमानीत करून जगणं असह्य करणार्या प्रवृत्तींचा कुठला आणि कसा सन्मान करायचा?

बारामतीची काटेवाडी परिचीत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणं तसं अवघड.महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल सहा दशकं आपले स्थान अढळं ठेवणारे शरद पवार यांच हे गाव.शरद पवार यांच्या कर्तृत्वामुळे या गावाची ख्याती सर्वदूर नेली असतांना याच गावातील काही नतद्रष्ट प्रवृत्तींनी  शिक्क्षकी पेशाला काळीमा फासला आहे. सारा भारत सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्म दिनी साजरा केला जाणार्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरूजनांचा सन्मान करीत असतांना याच काटेवाडीत शिक्षकांच्या वेशात असलेल्या नतद्रष्टांनी आपलीच सहकारी असलेल्या विजया उर्फ उमा  विजय गिरी या शिक्षिकेला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल झाली आहे.या तक्रारीत नमूद मसुद्याप्रमाणे
विजया ऊर्फ उमा  विजय गिरी गोसावी या काटेवाडी ता . बारामती  येथे जुन २०१४ पासुन शिक्षक म्हणून नोकरीस होत्या. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात श्रीमती गिरी यांनी सुचवले की, “कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पवित्र संविधानाने व सरस्वती पुजनाने करु”. ही सुचना ऐकताच त्याच  शाळेतील  शिक्षक सर्जे  म्हणाले की, ” कोण रे ही ?तु खाली बस”, असे म्हणून सर्जे यांनी विजया गिरी यांचा भर कार्यक्रमात  अपमान केला, त्यानंतर विजया गिरी यांच्या गाडीस समोरुन आडवी गाडी घातली व पुन्हा अपमानास्पद वागणूक दिली. तसेच शाळेतील  राणे, नंदकुमार जाधव , सुशिला गायकवाड   यांनी  विजया गिरी शाळेत येऊ नये म्हणून शाळेचे गेट मुद्दामहून  बंद करून  घेण्यास सुरूवात केली. तसेच शाळेच्या  हजेरी पटावर विजया गिरी यांना लाल शाहीने सही करण्यास बळजबरीने  भाग  पाडत, तसेच वरील सर्व शिक्षक वर्ग चालू असताना मुलांना म्हणायचे की,”तुम्ही  वेड्या बाईच्या वर्गात कशाला बसता?” या प्रकारे या शिक्षकांनी  स्वतःच्याच पविञ स्थान असणार्या शिक्षकी पेशास काळीमा  फासत  विजया  गिरी यांचा सातत्याने  अपमान करुन  त्रास देणे चालुच ठेवले. विजया गिरी यांनी  शाळेच्या  व्यवस्थापनाकडे व पंचायत समितीचे अधिकारी भोंगे  यांच्याकडे तक्रार केली होती, पण त्यांनीही लक्ष दिले नाही, त्यामुळे वरील शिक्षकांना  विजया गिरींना  जास्तच  त्रास  देण्यास स्फुरण चढले.अखेर हा छळ वाढत गेल्याने जगणं असह्य झालेल्या  विजया गिरी यांनी  शिक्षक दिनानंतर अवघ्या चार दिवसांनी म्हणजे ९ सप्टेंबरला   वरील शिक्षकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची सुसाईड नोट लिहुन दोन चिमुकल्यांसहा पतीचा कायमचा निरोप घेत  गळफास लावून  आत्महत्या केली आहे.
विजयाच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सर्व शिक्षक, शिक्षिका यांचेवर त्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच व्यवस्थापन व पंचायत समितीचे अधिकारी भोंगे यांनी त्यांच्याकडे शाळेची जबाबदारी असताना त्यांनी  संबंधित शिक्षकांवर कायदेशीर कारवाई का केली नाही?  याची चौकशी व्हावी.अशी समाजाची अपेक्षा आहे,ही अपेक्षा पुर्ण व्हावी म्हणून पञकार तथा समाजसेविका ज्योती गोसावी यांच्यासह अनेक समाज धुरीणांच्या नेतृत्वाखाली दुर्दैवी विजयाला न्याय देण्यासाठी धडपड सुरू केली आहे.व्यवस्थेने या धडपडीला रास्त प्रतिसाद देऊन नराधम प्रवृत्तींच्या मुसक्या आवळाव्यात हीच विजयाला खरी श्रध्दांजली ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published.