जनतेने ऊर्जा बचत करावी – ऊर्जामंत्र्यांचे आवाहन : प्रथमेश वाघमारे

जनतेने ऊर्जा बचत करावी – ऊर्जामंत्र्यांचे आवाहन

 

मुंबई, ( प्रथमेश वाघमारे ) : कमी वीज निर्मितीमुळे राज्यावर निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जनतेने ऊर्जा बचत करुन शासनाला सहकार्य करावे व भारनियमनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यास मदत करावी, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

ऊर्जा बचतीचे आवाहन करताना श्री.बावनकुळे म्हणाले, गरज नसताना वीजेचा वापर टाळावा. घरात सर्व ठिकाणी एलईडी बल्ब,टयूबलाईटचा वापर करावा. आवश्यकता नसेल तर पंखे सुरु करु नयेत. गरज असेल तेव्हाच एअर कंडिशनरचा उपयोग करावा. टीव्ही, पंखे सतत सुरु ठेवू नये. ज्या भागात भारनियमन नाही अशा भागातील नागरिकांनी वीज सुरु असतानाही किमान दोन तास वीज वापर स्वत:हूनच बंद ठेवावा. अशा उपाययोजना केल्या तर वीज बचत होईल व ज्या भागांना वीज मिळत नाही अशा भागांना वीजपुरवठा करुन त्या नागरिकांनाही भारनियमनाच्या संकटापासून दिलासा देणे शक्य होईल.

महानगरपालिका, नगरपरिषदा,ग्रामपंचायतींनी पथदिवे तासभर उशिरा सुरु करुन पहाटे पाच वाजता बंद करावे. अनेक ठिकाणी दिवसभर पथदिवे सुरु असतात. वीजेचा असा अपव्यय टाळावा. शासकीय व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिवसाच्या वेळी लाईटचा वापर करु नये. अत्यंत आवश्यक असेल तेथे दिवसा लाईट वापरावे. कार्यालयाच्या बाहेर जाताना लाईट पंखे सुरु राहणार नाही, याची काळजी घ्यावी. आठवणीने लाईट, पंखे बंद करावेत. या उपाययोजनांतून वीज बचत करुन शासनाला सहकार्य करावे, असेही ऊर्जामंत्री श्री.बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.