खाजगी  बिल्डरने बनविलेल्या कोलशेत येथील स्पीड  ब्रेकरमुळे एका रात्रीत ७ अपघात -४ गंभीर जखमी  संतप्त नागरिकांनी केली बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड

खाजगी  बिल्डरने बनविलेल्या कोलशेत येथील स्पीड  ब्रेकरमुळे एका रात्रीत ७ अपघात -४ गंभीर जखमी 
संतप्त नागरिकांनी केली बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड

ठाणे , ( शरद घुडे ) :
खाजगी बिल्डरने रस्त्यावर बनविलेल्या स्पीड ब्रेकरमुळे कोलशेत परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे एकारात्रीत सात अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तब्बल चार लोक गंभीर जखमी झाले. बिल्डरच्या मनमानी कारभाराने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून लोढा बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात नागरिकांविरोधात दंगलीचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले असून पोलीस अधिक तापस करीत आहेत .

ठाण्याच्या कोलशेत गाव परिसरातील रस्त्यावर लोढा बिल्डरने स्पीडब्रेकर बनविला या स्पीड ब्रेकरचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या  वाहनांना आणि वाहन चालकाना होत होता. बुधवारी संध्याकाळ  ते गुरुवार सकाळ पर्यंत या स्पीड ब्रेकरमुळे तब्बल ७ लहान-मोठे अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. बिल्डरच्या फायद्यासाठी आवश्यकता नसताना उभारलेल्या अडथळा आणि झालेले अपघात याच्या निषेधार्थ स्थानिक संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी रस्त्यावर उतरून बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड केली. एका रात्रीत झालेल्या विविध अपघातात ओमप्रकाश सिंग,हेमंत जगदाळे, जय अरुण पाटील, हेमाली अरुण पाटील, हे जखमी झाले आहेत. यातील सिंग यांच्या छाती,पायाला आणि तोंडाला मार लागला आहे. जगदाळे यांच्या कानाला,पायाला आणि छातीत मार लागलेला आहे . तर जय,हेमाली यांच्या पायाला दुखापत झाली आहे. तर रिक्षा चालक अशोक मोतीराम शेळके यांची रिक्षा स्पीड ब्रेकरमुळे पलटी  झाली. यात संतोष अंकुश पाटील, अन्नू नारायण शेट्टी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमीत हेमंत जगदाळे आणि ओमप्रकाश सिंग यांचा समावेश आहे. संतप्त नागरिकांनी केलेल्या तोडफोड प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास कापुरबावडी पोलीस करीत आहेत.       

Leave a Reply

Your email address will not be published.