पालघरमध्ये बदली होणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यातच सामावण्याचा प्रयत्न  जिल्हा परिषदेतील महत्वपूर्ण बैठकीने शिक्षकांना दिलासा

पालघरमध्ये बदली होणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यातच सामावण्याचा प्रयत्न 
जिल्हा परिषदेतील महत्वपूर्ण बैठकीने शिक्षकांना दिलासा

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यात बदलीची टांगती तलवार असलेल्या शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पालघरमधून ठाण्यात येण्यासाठी इच्छूक शिक्षकांना सामावून घेण्याबरोबरच ठाण्याहून पालघरमध्ये बदली होणाऱ्या शिक्षकांनाही ठाणे जिल्ह्यातच सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती सुभाष गोटीराम पवार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर वर्षानुवर्षे प्रलंबित चट्टोपाध्याय समितीच्या महत्वाच्या शिफारशींची 15 मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्याच्या सुचनाही पवार यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पवार यांनी शिक्षकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित समस्यांचा आढावा घेण्यासाठी `मॅरेथॉन’ बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना यादव, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांबरोबरच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शिक्षकांच्या समस्यांबरोबरच प्रशासनाच्या अडचणीही उपाध्यक्षांनी समजून घेतल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव व अन्य पदाधिकाऱ्यांबरोबरच चर्चा करुन शिक्षण व्यवस्थेत सुधारणेबरोबरच शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.

2014 मध्ये झालेल्या जिल्हा विभाजनानंतर शिक्षकांवर बदलीची टांगती तलवार असून, अन्याय झाल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा सहानुभूतीने विचार करण्याच्या सुचना देत पालघर जिल्ह्यातून बदलीसाठी पात्र झालेल्या शिक्षकांना ठाणे जिल्ह्यात सामावून घ्यावे. मात्र, ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यात बदली होणाऱ्या कर्मचारीही ठाणे जिल्ह्यातच कसे कार्यरत राहतील,याचा विचार करून या शिक्षकांना जिल्ह्यातील शाळांमध्येच सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पवार यांनी सांगितले.

वर्षानुवर्षे प्रलंबित चट्टोपाध्याय समितीच्या महत्वाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. निवडश्रेणी, वेतन समानीकरण, विकल्प आदी मुद्यांची 15 मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश पवार यांनी शिक्षणाधिकारी यादव यांना दिले. त्याबाबत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यादव यांनी दिले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

 

वीजबिले भरण्याची 
शिक्षकांची फरपट टळणार

शाळांना मिळणाऱ्या सादील खर्चातून शाळेची वीजबिले भरण्यासाठी तरतूद आहे. मात्र, डीजिटल शाळांबरोबरच साहित्यामुळे मोठ्या रकमेचे वीज बिल येते. ते भरण्यासाठी सादील खर्च अपुरा पडतो. त्यामुळे शिक्षकांना लोकवर्गणी वा स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागतात. मात्र, आता शाळेचे बिल ग्रामपंचायतीने भरण्याचा आदेश उपाध्यक्ष पवार यांनी दिला. त्यामुळे दरमहा शिक्षकांची वीजबिले भरण्यासाठी फरपट टळणार आहे.

 

बैठकीतील महत्वाचे निर्णय

शिक्षकांचे पगार दरमहा 5 तारखेपर्यंत 

पोषण आहार बिले लवकर मंजूर होणार

वैद्यकीय खर्च फाईल व प्री-ऑडीट बिले लवकर निकाली

केंद्रस्तरीय स्पर्धांबरोबरच क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात वाढ

क्रीडा स्पर्धेत जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी अनुदान

पदवीधर शिक्षकांना सहशिक्षक म्हणून घेण्याबाबत स्वतंत्र बैठक

पालघरमधून नियुक्तीवर आलेल्या शिक्षकांच्या जुन-जुलैतील पगारासाठी तरतूद

Leave a Reply

Your email address will not be published.