ठेकेदाराची अरेरावी,वेतनातून पैसे कपात—–प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन  २४० घंटागाडी कर्मचाऱ्यांचा “काम बंद”चा एल्गार 

ठेकेदाराची अरेरावी,वेतनातून पैसे कपात—–प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन 
२४० घंटागाडी कर्मचाऱ्यांचा “काम बंद”चा एल्गार 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
ठेकेदाराची अरेरावी,आगाऊ रक्कम घेतली नसतानाही वेतनातून रक्कम कापून घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून घंटागाडी कर्मचारी यांनी कामबंद आंदोलनाचा एल्गार केला आहे. वेतन कपातीबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा घंटागाडी कर्मचारी यांनी दिला आहे. दरम्यान ठाण्याच्या वर्तकनगर, रायलादेवी आणि मानपाडा प्रभाग समितीत गुरुवारी कचरा न उचलल्या मुळे कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र केल्यास विविध प्रभाग समितीत कचऱ्याची  बिकट समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे पालिका परिक्षेत्रात तब्बल २४० घंटागाडी कर्मचारी आहेत. सगळे कर्मचारी यांनी कामबंद ची हाक देत एकही घंटागाडी रस्त्यावर काढली नाही. गुरुवारी ठाण्याच्या वर्तकनगर,वागळे रायलादेवी,आणि माजिवडा मानपाडा परिसरात कचरा पेट्या फुल्ल झाल्या आहेत. घंटागाडी कर्मचारी यांच्या म्हणण्यानुसार  ठाणे महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या अ गट घंटागाडी कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. या कर्मचार्‍यांसाठी गणवेश देण्यासाठी पालिकेने सदर ठेकेदाराला निधी अदा केला आहे. मात्र, त्या निधीनुसार गेले पाच वर्षात वेतनच दिले गेले नव्हते. त्यावरुन तसेच किमान वेतनावरुन कर्मचार्‍यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेवरील निर्णयाची प्रतीक्षा असतानाच  दोन महिन्यांपासून कामगारांनी उचल घेतलेली नसतानाही त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कापली जात होती. मागील महिन्यात या संदर्भात संघटनेने पत्रव्यवहारही केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन या महिन्यात 21 तारखेला वेतन अदा करुन त्यातून ठराविक रक्कम कापण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या घंटागाडी कारभारी यांनी गुरुवारी सकाळपासूनच “कामबंद” आंदोलनाचा एल्गार केला. ठेकेदार एम.कुमार या ठेकेदाराकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे वर्तक नगर , रायलादेवी आणि मानपाडा या भागातील कचरा उचलण्यात आला नाही. दरम्यान, जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर उद्यापासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महेंद्र हिवराळे यांनी दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.