लासलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व व्यापारी संकुल, उद्यान उभारण्याची जयदत्त होळकर यांची मागणी

लासलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व व्यापारी संकुल, उद्यान उभारण्याची जयदत्त होळकर यांची मागणी 

लासलगाव (वार्ताहर): समीर पठाण
लासलगाव येथे बस स्थानकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व व्यापारी संकुल, उद्यान उभारण्यात यावी अशी मागणी जयदत्त होळकर यांनी परिवहन मंत्री मा.ना. दिवाकरजी रावते साहेब यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

लासलगाव शहर हे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे.लासालगावची लोकसंख्या २०००० च्या वर असुन बाजारपेठेमुळे तरंगती लोकसंख्या ४० ते ४५ हजार आहे. लासलगाव शहरा मध्ये दुय्यम निबंधक श्रेणी ०१ चे कार्यालय, महसूल मंडल, तलाठी कार्यालय, शासनमान्य सार्वजनिक वाचनालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जुनियर,सिनियर आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेज, जिल्हा परिषद, मराठी शाळा, उर्दू शाळा, बस स्थानक व आगार, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, सात राष्ट्रीय कृत बँका व एटीम, कमर्शियल बँका, व फायनान्स कंपनी, मंगल कार्यालय, सिनेमा थिएटर, भुयारी गटार, संपूर्ण गावात स्ट्रेट लाईट, टेलिफोन एक्सचेंज, कॉंक्रीट रस्ते, पोस्ट ऑफिस, खरेदी विक्री संघ, पाणीपुरवठा योजना, व्यायाम शाळा, इत्यादी नागरी सुविधा ग्रामपंचायतीने पुरविल्या आहेत.

बस स्थानकाच्या आवारात महामंडळाच्या मालकीची फार मोठीजागा रिकामी असल्याने टपरी मार्केट हटवून दुमजली भव्य बी.ओ.टी. तत्वावर व्यापारी संकुल बांधता येईल त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होऊन विविध प्रकारचे व्यवसाय सुरू होतील.मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होईल व महामंडळास गाळ्याचे बांधकामातून मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल.त्याच बरोबर यापूर्वी महामंडळाने मोकळ्या जागेत भव्य उद्यान केलेले होते व कारंजा देखील बांधलेला होता व उद्यानास कंपाऊंड करुन पोल उभे करुन लाइटची व्यवस्था केल्याने लासलगावच्या वैभवात भर पडलेली होती. परंतु सदरचे उद्यान नष्ट झालेले आहे हि जागा अदयाप रिकामी आहे

लासलगाव आगाराने ह्या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या होत्या परतू कालांतराने महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याने या सुविधा पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत त्यामुळे पुनश्च या सुविधा नव्याने कराव्यात व तसेच या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हि होऊ शकतो या सर्व गोष्टीचा एकत्रित विचार करुन आपल्या स्थरावरुन त्वरित लासलगाव येथे बी.ओ.टी. तत्वावर व्यापारी संकुल उभारावे व त्याच बरोबर अनेक दिवसांपासून लासलगाव परिसरातील अनेक शिवप्रेमींची मागणी आहे कि लासलगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा लासलगाव मध्ये रोड फ्रन्टवर फक्त एसटी महामंडळाची जागा यासाठी योग्य व संरक्षणात्मक आहे.
सदरचा प्रस्ताव यापूर्वीही मा. विभाग नियंत्रक साहेब महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग यांच्याकडे सादर करण्यात आलेला होता व त्या अनुषंगाने अधिकाऱ्या मार्फत व्यापारी संकुल उद्यान व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा यासाठी जागेची पाहणी करण्यात आलेली होती. त्या वेळेस मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मा. किशोर गजभीये साहेब मुंबई हे कार्यरत होते व लासलगावचे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कुसुमताई होळकर यांनी शिष्टमंडळासह सदर काम व्हावे म्हणून मुंबई येथे त्यांच्या दालनात भेट घेतली होती त्यामुळे व्यापारी संकुल, उद्यान व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम सुरु करावे अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी सरपंच जयदत्त होळकर यांनी निवेदना द्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.