येरमाळ्याची येडेश्वरी माता

येरमाळ्याची येडेश्वरी माता

प्रतिकल्पमवतरति रामश्चन्द्रपरिक्षार्थम् ।
भक्तांन्वरदायिनी या येडेश्वरी नमो$स्तुते ।।

 

_

( अनादि काळापासून अनंत काळापर्यंत ) ज्या आदिशक्ती ज्योतिस्वरूपा समस्त चराचराचे स्वामी प्रभू श्रीरामचंद्र यांची परीक्षा घेण्यासाठी येरमाळा या ठिकाणी प्रत्येक कल्पामध्ये अवतार घेतात , ज्या भक्तांना वरदायक आहेत, त्या जगज्जननी पार्वतीस्वरूप येडेश्वरी माताश्रींना मी नमस्कार करतो ._

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा गावापासून ०३: ५० किलोमीटर अंतरावर येडेश्वरी माताश्रींचे मंदिर आहे . या ठिकाणी चैत्र पौर्णिमा , इतर पौर्णिमा , घटस्थापना , दसरा , श्रावण , रक्षाबंधन या दिवशी खूप मोठी यात्रा भरते . लाखोंच्या संख्येने भाविक येतात . तसेच मंगळवारी व शुक्रवारी अनेक भाविक वारी करतात . येरमाळ्याच्या येडेश्वरी माताश्री या छत्रपती शिवराय व महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी माताश्री यांच्या धाकट्या भगिनी आहेत , असे मानले जाते . येडेश्वरी माताश्रींचे दर्शन घेण्यासाठी लोक फक्त महाराष्ट्रातूनच येतात असे नाही तर संपूर्ण भारतभरातून ( भारतातील अनेक राज्यांतून ) येतात . येरमाळा येथील येडेश्वरी माताश्रींचे देवस्थान हे जागृत देवस्थान आहे , अशी भाविकांची श्रद्धा आहे .

येडेश्वरी माताश्रींचे मूळ मंदिर हेमाडपंथीय आहे . देवीचा मुखवटा हा स्वयंभू आहे . माताश्रींच्या गाभाऱ्यासमोर भगवान परशुरामाची गादी व मूर्ती ( मुखवटा ) आहे . तसेच मंदिराभोवती गणेश , दत्त , शिव , भैरवनाथ , मातंगी , नृसिंह व जानाई , इत्यादी देवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत . माताश्रींच्या मंदिराला २०५ पायऱ्या आहेत . येडेश्वरी मंदिराकडे येरमाळ्याकडून जाताना मध्येच दत्त कल्लोळ तीर्थ लागते . अनेक भाविकजन मंदिरात जाण्यापूर्वी या दत्त कल्लोळ तीर्थात स्नान व ओल्या कापडाने मंदिरापर्यंत दंडवत घेतात . शासनाने या देवस्थानाला ” क ” दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे . ” नवसाला पावणारी देवी ” अशी माताश्रींची ख्याती आहे .

_

या देवस्थानासंबंधी एकूण 2 आख्यायिका सांगितल्या जातात ._

आख्यायिका ०१:

येडेश्वरी माताश्री या पार्वती माताश्रींच्या अवतार आहेत . संपूर्ण चराचराचे स्वामी प्रभू श्रीरामचंद्र हे जगज्जननी कमलनयन सीता माताश्रींच्या शोधार्थ श्रीलंकेकडे जात होते . प्रभू श्रीरामचंद्र हे जनकनंदिनी सीता माताश्रींच्या विरहाने व्याकुळ होऊन प्रत्येक झाडाला , ” सीते ” , ” सीते ” म्हणून मिठी मारत होते . व पशुपक्षांना ‘ माझी सीता कुठे आहे ‘ ? असे विचारत होते . त्यावेळी कैलासामधून भगवान शंकर व आदिमाया आदिशक्ती पार्वती (भवानी ) माताश्री हे दोघे दृश्य पाहत होते . त्यावेळी पार्वती माताश्रींनी भगवान शंकरांना असा प्रश्न विचारला की प्रभू श्रीरामचंद्र तर समस्त चराचराचे स्वामी आहेत . ते साक्षात परमेश्वर आहेत . मग हे अज्ञानी व्यक्तींप्रमाणे शोकाकुल का होत आहेत ? जे पत्नीच्या विरहाने व्याकुळ होत आहेत ते कसले परमेश्वर ?

तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र यांच्या श्रीचरणांवर ज्यांची अनादि व अनंतकाळासाठी अढळ निष्ठा आहे , ते श्रीरामभक्त शंकर भवानी माताश्रींना म्हणाले की , ” प्रभू श्रीरामचंद्रांचे शोक करणे , रडणे ह्या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत . प्रभू श्रीरामचंद्र हे अंतर्यामी व त्रिकालदर्शी आहेत .त्यांना जनकनंदिनी कमलनयन सीता माताश्री या श्रीलंकेत आहेत , हेसुद्धा माहित आहे । ” तेव्हा भवानी माताश्रींना प्रभू श्रीरामचंद्राच्या ‘परमेश्वरत्वा’ वर शंका आली . तेव्हा श्रीरामभक्त शंकर यांनी भवानी माताश्रींना प्रभू श्रीरामचंद्रांची परीक्षा घ्यावी असे सुचवले .तेव्हा भवानी माताश्रींनी प्रभू श्रीरामचंद्र बालाघाट डोंगर रांगावरील येरमाळा येथे आले असता कमलनयन सीता माताश्रींचे रूप धारण करून प्रभू श्रीरामचंद्रांसमोर आल्या . तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी समोर आलेल्या कमलनयन सीता माताश्री नसून साक्षात आदिमाया आदिशक्ती जगज्जननी भवानी माताश्री आहेत हे ओळखून माते तू वेडी आहेस , तू कमलनयन सीता नसून माझी परीक्षा घेण्यासाठी आलेली आदिमाया आदिशक्ती माता पार्वती आहेस । ” असे भवानी माताश्रींना म्हटले व त्यांच्या श्रीचरणकमलांचे दर्शन घेतले . तेव्हा पार्वती माताश्रींनी आपले खरे स्वरूप प्रकट केले व प्रभू श्रीरामचंद्रांना आशीर्वाद दिला . तेव्हापासून श्रीक्षेत्र येरमाळा येथे पार्वती माताश्री आपल्या येडेश्वरी स्वरूपात वास्तव्य करून आहेत . संपूर्ण चरचराचे स्वामी प्रभू श्रीरामचंद्र यांनी पार्वती माताश्रीं यांस ” येडी ” असे संबोधल्याने पुढे या देवीचे नाव ” येडेश्वरी ” असे पडले .

आख्यायिका ०२:

येडेश्वरी माताश्री या माहूरच्या रेणुका माताश्रींचे स्वरूप आहेत . भवानी माताश्रींनी अंशरूपाने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला . त्यांचे रेणू असे नामकरण करण्यात आले . त्यांचा विवाह शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या ” जमदग्नी ” महर्षींसोबत झाला . जमदग्नी महर्षींनी यज्ञकर्मासाठी देवतांनी कामधेनू दिली होती . राजा सहस्रर्जुनाने कामधेनू प्राप्तीसाठी जमदग्नी ऋषींना ठार मारले . घडला प्रकार पाहून क्रोधित परशुरामांनी अत्याचारी क्षत्रियांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली . तसेच भगवान दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून माहुरगडावर पित्याचे अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेल्या . मातेच्या सती जाण्यामुळे भगवान परशुराम शोक करू लागले , तोच आकाशवाणी झाली , ” तुझी आई जमिनीखालून वर येईल , तू तोपर्यंत मागे पाहू नकोस । ” परंतु भगवान परशुरामांनी उत्सुकतावश मागे पाहिले . त्यावेळी रेणुका माताश्रींचे फक्त मुखच वर आलेले होते . म्हणून रेणुका माताश्रींच्या फक्त मुखाचीच पूजा केली जाते . अगदी त्याचप्रमाणे रेणुका माताश्रींचेच स्वरूप असलेल्या येडेश्वरी माताश्रींच्यासुद्धा फक्त मुखाचीच पूजा केली जाते . ( गाभाऱ्यात श्रींची मूर्ती पूर्ण नसून फक्त श्रीमुखच आहे ) येरमाळा येथील आबाजी पाटील यांना येडेश्वरी माताश्रींचा स्वप्नात दृष्टन्त झाला होता .


येडेश्वरी मंदिर अनादि व अनंत आहे

_शास्त्र व पुराणानुसार येडेश्वरी मंदिर अनादि व अनंत आहे ._

सर्वप्रथम आपण वैदिक कालगणना पाहू . सत्ययुग , त्रेतायुग , द्वापारयुग व कलियुग अशी ४ युगे आहेत . सत्ययुगाचा कालावधी १७,२८,००० वर्षे , त्रेतायुगाचा कालावधी १२,९६,००० वर्षे , द्वापारयुगाचा कालावधी ०८,६४,००० वर्षे व कलियुगाचा कालावधी ०४, ३२,००० वर्षे आहे . सत्ययुग , त्रेतायुग , द्वापारयुग व कलियुग या युगांच्या चौकटीस एक महायुग / देवयुग / दिव्ययुग / चतुर्यग असे म्हणतात . ७१ महायुग / देवयुग / दिव्ययुग / चतुर्यग यांचे मिळून एक मन्वन्तर ( मनु + अंतर = मन्वन्तर म्हणजेच मनु मधील अंतर ) . तसेच मन्वन्तरे एकत्र येऊन किंवा १००० महायुग / देवयुग / दिव्ययुग / चतुर्यग एकत्र आले असता एक कल्प तयार होते . एक कल्प म्हणजेच ब्रह्मलोकस्थित ब्रह्मदेवाचा एक दिवस ( रात्र तर वेगळीच ) . ब्रह्मदेवाचा दिवस चालू असल्यास हे जग चालू राहते व ब्रह्मदेवाची रात्र सुरु झाल्यास जलप्रलय येऊन सर्व प्राणी निर्गुणात लय पावतात . 【 संदर्भ श्रीमद्भगवाद्गीता 】. ब्राह्मलोकस्थित ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षांचे असते . सध्याच्या ब्रह्मदेवाचे ५१ वे वर्ष चालू आहे . त्या ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यानंतर त्यांचा कारणोदक नावाच्या महासागरात लय होतो व त्या पदावर दुसरा ब्रह्मदेव तयार होतो . ब्रह्मदेव त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या म्हणजेच कल्पाच्या आरंभी नूतन सृष्टी निर्माण करतात व दिवसाच्या शेवटी प्रलय येऊन सृष्टीतील प्राणी नष्ट होतात . असे अनादिकालापासून चालत आले आहे व यापुढेही अनंतकाळापर्यंत चालत राहणार असे अनेक शास्त्रे व पुराणे सांगतात .

ब्रह्मन्डातील काही घटनांची अगदी जशीच्या तशी पुनरावृत्ती होत असते . परमेश्वर हा नित्यमुक्त असून जीव हा नित्यबद्ध आहे . एखाद्या जीवाला मुक्ती जरी मिळाली तर तो त्या मुक्तीच्या ठराविक काळापर्यंत मुक्त राहतो . मात्र मुक्तीचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा संसारबंधनात येतो . म्हणून मुक्तीनंतर पुन्हा संसारबंधनात बद्ध झालेल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी व संसारबांधनातून सोडवण्यासाठी परमेश्वर हे श्रीराम , श्रीकृष्ण इत्यादी अवतार धारण करतात .

अनादि व अनंत असलेले गोलोकवासी पुरुषोत्तम मुरलीधार भगवान श्रीकृष्ण हे बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक कल्पातील विशिष्ट मन्वंतरातील विशिष्ट महायुगात अवतार घेत आले आहेत व यापुढेही अनंतकाळापर्यंत अवतार घेतीलच हे निश्चित आहे . याचे प्रमाण कालिकापुराणामध्येसुद्धा दिलेले आहे .

प्रतिकल्पं भवेद्रामो रावणश्चपि राक्षस : । 
एवं राम सहस्राणि रावनाम: सहस्रश : ।।

_( अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत ) प्रत्येक कल्पामध्ये राम व रावण होऊन गेले आहेत . ( हजारो कल्पामध्ये ) राम हजार झाले असतील तर रावणही हजारो झाले असतील ._

【 संदर्भ : कालिका पुराण 】

म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर ब्रह्माण्डातील अनेक घटनांची जशीच्या तशी पुनरावृत्ती होते . या कल्पामध्ये जसे भगवान विष्णूचे राम , कृष्ण आदि अवतार , भगवान शंकराचे मार्तंड , मल्हारी , आदि अवतार , जगदंबा लक्ष्मी माताश्रींचे तुळजाभवानी , येडेश्वरी इत्यादी अवतार , भवानी माताश्रींचे तुळजाभवानी , येडेश्वरी इत्यादी अवतार या कल्पात जसे झाले अगदी तसेच हुबेहूब पुढच्या कल्पातही होतीलच . एवढेच नव्हे तर व्यास , परशुराम , कपिल , प्रल्हाद , ज्ञानेश्वर , सोपानदेव , निवृत्ती , मुक्ताबाई हे देखील या विद्यमान ” श्वेतवाराह ” कल्पाप्रमाणे इतर पुढील कल्पांमध्येही पुन्हा पुन्हा अवतार घेतील . त्याचप्रमाणे मधू , कैटभ , रावण , कुंभकर्ण , जालंधर ,नरकासुर इत्यादी महादैत्यसुद्धा प्रत्येक कल्पामध्ये पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण होतात . प्रत्येक कल्पामध्ये प्रभू श्रीरामचंद्र अयोध्या येथे जन्म घेणार , त्यांचा जनकनंदिनी कमलनयन सीतामाताश्रींसोबत विवाह होणार , पुढे त्यांचे रावणाद्वारे हरण होण्यापूर्वी खऱ्या सीतामाता ब्रह्मलोकांत जाणार व पूर्वजन्मीच्या वेदवती या सीतामाता बनणार व त्यांचे रावणाद्वारे हरण होणार व प्रभू श्रीरामचंद्राद्वारे पूर्वीचे जय , विजय असणारे पार्षद जे सनकादि ऋषींच्या शापामुळे जे महादैत्य रावण व कुंभकर्ण बनले होते त्यांना व अनेक दैत्यांना मुक्ती मिळणार हे अनादि काळापासून चालत आलेले आहे अनंतकाळापर्यंत चालत राहणार . असे अनेक शास्त्रे व पुराणे यांमध्ये संदर्भ दिले आहेत .

यात्रा / महोत्सव

चैत्र पौर्णिमेनंतर माताश्रींची पालखी मंदिरावरून येरमाळ्यातील चुन्याच्या रानात जाते व त्याठिकाणी भाविक चुनखडी वेचतात व त्यानंतर पालखी ५ दिवस आमराईत मुक्कामी राहते . लाखोंच्या संख्येने भाविक येतात . अनेक वेळा माताश्रींच्या पालखीवर हेलिकॉप्टर किंवा विमान यांनी पुष्पवृष्टी केली जाते . चैत्र महिन्यांत सर्व परिसर भाविकांनी गजबजून / फुलून गेलेला दिसतो. या ५ दिवसांत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात . त्यापैकीस प्रमुख कार्यक्रम कुस्त्या , पशु प्रदर्शन , आराधी गीते , त्यानंतर शोभेची दारू आकाशात उडवली जाते व ५ व्या दिवशी आंबील घुगरीचा दुपारी 3 वाजता महाप्रसाद होतो व त्यानंतर ४ वाजता पालखी डोंगराकडे ( मंदिराकडे ) निघते . तसेच पहिल्या दिवशी यात्रेदरम्यान पहिल्या दिवशी जो चुना वेचला जातो तो गोळा करून त्याची भट्टी लावली जाते . तो चुना मंदिराकडे आणला जातो व अष्टमीच्या दिवशी त्या चुन्याने मंदिर सारवले जाते . श्रावण महिन्यामध्येसुद्धा येडेश्वरी माताश्रींच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात व माताश्रींचे मंदिर स्थित असलेल्या डोंगराची परिक्रमा करतात . यालाच लोक ” खेटा घालणे ” असे म्हणतात . काही लोक डोंराभोवती दोरा गुंडाळून खेटा घालतात . मंदिराजवळील दुकानांत त्या दोऱ्याच्या रीळ भेटतो . डोंगराला प्रदक्षिणा घातल्यामुळे तसेच दोऱ्याद्वारे खेटा पूर्ण करण्याने मनोकामना पूर्ण होतात आता काही भाविकांचा अनुभव आहे . घटस्थापना ते दसरा या कालावधीमध्ये भाविकांची खूप गर्दी असते . नवरात्रीमध्ये आईसाहेबांची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते . अनेक भक्त देवीच्या मंदिरात येऊन ज्योत प्रज्वलित करतात व ती ज्योत ज्वलंत ठेऊन आपल्या गावापर्यंत जातात . दसऱ्याच्या दिवशी अनेक भक्तजन सीमोल्लंघन करतात . चैत्र पौर्णिमा , नारळी पौर्णिमा। , माघी (नव्याची ) पौर्णिमा तसेच नवरात्रोत्सव या काळात आईसाहेबांचा आरतीसह छबिना मिरवणूक काढली जाते . लग्न झालेले नवदाम्पत्य या ठिकाणी भोगी , जागरण गोंधळ , घंघाळ भरणे , विदा करणे , नाव ठेवणे , इत्यादी अनेक विधी करण्यासाठी मंगळवार , शुक्रवार या दिवशी येतात .

कसे जावे

येरमाळा हे गाव औरंगाबाद/ धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाजवळ वसलेले आहे . बार्शीपासून कळंब – अंबेजोगाई कडे जाताना ३० किलोमीटर अंतरावर आहे . कळंब कडून बार्शी – पुणे कडे जाताना २५ किलोमीटर अंतरावर आहे . उस्मानाबाद व लातूर कडून येणाऱ्या भाविकभक्तांना येडशीमार्गे येरमाळा या गावी जावे लागते . येडशी ते येरमाळा हे अंतर १८ किलोमीटर आहे . तसेच येडशीमार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी मलकापूरचा शॉर्टकट रस्तासुद्धा आहे . मंगळवार , शुक्रवार तसेच यात्रेच्या दिवशी येरमाळ्यातून येडेश्वरी मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात .

© अजय अण्णासाहेब लोमटे
रा . मलकापूर , पोस्ट : येरमाळा
ता . कळंब , जि . उस्मानाबाद 413 525
Whatsapp No : 9112147456

Leave a Reply

Your email address will not be published.