बिल्डर माफियांचा फंडा- अनधिकृत इमारतींवर  उभे राहताहेत  अनधिकृत माळें 

बिल्डर माफियांचा फंडा- अनधिकृत इमारतींवर  उभे राहताहेत  अनधिकृत माळें
 
बांधकामावर कारवाई…. बिल्डरवर फौजदारी गुन्हा
    दाखल करण्याची मनसेची मागणी
 
ठाणे : प्रतिनिधी  : पाच वर्षापूर्वी मुंब्रा परिसरात ७ मळ्याची अनधिकृत इमारत कोसळून तब्बल ७४ निरपराध नागरिकांना जीव गमवावे लागल्याच्या घटनेनंतर हि पालिका अधिकारी यांच्या संगनमताने बिल्डर माफियांचे अनधिकृत बांधकामे बंद किंवा त्यांना आळा बसलेला नाही याचे सचित्र दर्शन घडत आहे. मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनेक अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत इमारतीवर अनधिकृत माळे चढविण्याचे काम सुरु आहे. पालिकेची कुठलीही परवानगी न घेता थेट इमारती उभारल्या जात आहेत. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि मुख्यालयातील अधिकारी वर्गाने अनधिकृत बांधकामांवर धडक  कारवाईचे आदेश दिले . मात्र  आता बिल्डर माफियांनी  नावाच फंडा सुरु केला आहे, अनधिकृत इमारतींवर अनधिकृत माळे चढविण्यात येत आहेत. पूर्वीच कमकुवत असलेल्या किंवा नाल्याच्या शेजारी असलेल्या इमारतीवर अनधिकृत माळे चढविण्यात आल्यास मुंब्रा परिसर पुन्हा एकदा मुंब्रावासियांना लकी कंपाऊंड दुर्घटने सारख्या दुर्घटनेला समोर जावे लागणार असेच चित्र आहे.
             
मुंब्रा दिवा प्रभाग समितीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. प्रभाग समिती अधिकारी आणि बिल्डर माफिया यांच्या संगनमताने अनधिकृत इमारतींवर अनधिकृत माळें चढविण्याचा नवा फंडा मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत सुरु आहे, मुंब्रा प्रभाग समिती परिसरात अल्मास कॉलोनी मध्ये अहमद बिल्डींगवर अनधिकृत माळे  चढवून त्यात रहिवाशांना ही राहण्यासाठी देण्यात आले. सूत्राच्या माहितीनुसार ही  इमारत पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत आहे. सध्या मुंब्र्यात काकनगर, एम एस कॉलेज, सम्राट नगर, रशीद कंपाउंड,नशेमन कॉलोनी आदी परिसरात मोठ्या जल्लोषात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. या सर्व बांधकामांची माहिती पालिका अधिकारी याना आहे. प्रभाग क्र २९,३३ शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौसर हॉटेल समोर नाईस पार्क च्या बाजूला हिदायत शाळेच्या बाजूला, भोलेनाथ नगर मंदिर शेजारी अनधिकृत बांधकाम दिवस ढवळ्या सुरु आहे. या अनधिकृत बांधकामाची तक्रार मनसे वार्ड अध्यक्ष प्रभाग क्र -२९ चे शरद पाटील यांनी लेखी स्वरूपात तक्रार पालिका आयुक्त याना केली आहे. मुंब्रा शीळ प्रभाग समितीत सुरु असलेली बांधकामे ही भूमाफिया बिल्डर आणि पालिका प्रभाग समिती अधिकारी यांच्या संगनमतानेच सुरु असल्याचा आरोप पाटील यांनी लेखी स्वरूपात करीत बिल्डर माफियांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे १९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेली आहे. 
 
        तक्रारदार पोलीस किंवा भूमाफिया
        बिल्डरांच्या दबंगशाहीला पडतात बळी 
 
            मुंब्रा-दिवा प्रभाग समितीत होणाऱ्या अनधिकृत राजरोस बांधकामाच्या तक्रारी करणाऱ्या तक्रारदार किंवा माहितीचा अधिकार टाकणाऱ्या कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात तक्रारी करून अडकविण्याचा षडयंत्र करण्यात येते. किंवा भूमाफिया बिल्डर यांच्या मारहाणीचा बळी पडावे लागते. फसवणूक झालेल्या लोकांना न्याय देण्यासाठी काम करणाऱ्या एका साप्ताहिकाच्या संपादकाला डायघर पोलीस ठाण्यात बिल्डरांनी चोप दिला. तरीही बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात  आला नाही. केवळ (एनसी )अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण सोडण्यात आले. मात्र साप्ताहिकाच्या संपादकाने  बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे पत्र मुख्यमंत्री ते ठाणे पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त याना लेखी तक्रार अर्ज केला. १९ सप्टेंबर ला पहाटे ३-४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेचा गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला  नाही. या मारहाणीचे चित्रण पोलीस ठाण्यातील सीसी टीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावा तक्रारदार करीत आहे. डायघर पोलीस नाही सीसीटीव्ही पुटेज तपासत नाही आणि बिल्डरवर मारहाणीचा  गुन्हाही दाखल करण्यास तयार नाहीत. 
——————-
 
नुकतीच स्वतंत्र झालेली शील-दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामाची तक्रार आल्यानंतर शहानिशा करून त्वरित पालिकेची कारवाई करण्यात येते. सन २०१८ या वर्षात १ जानेवारी २०१८ ते ९ अक्टोबर  या कालावधीत शीळ -दिवा प्रभाग समितीत तब्बल १०० हुन अधिक बांधकामावर कारवाई सोबत हुक्का पार्लर आणि फेरीवाले यांच्यावर सातत्याने कारवाई करीत २१८ वेळा कारवाई करण्यात आली.
 
  – डॉ. सुनील मोरे (शीळ-दिवा प्रभाग समिती वार्ड अधिकारी)
——————————
 
मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाची कुठलीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नाही. तसेच कुठलेही अनधिकृत बांधकाम सुरु ही नाही.
 
      – बाळू पिचड(मुंब्रा प्रभाग समिती वार्ड अधिकारी)
 
राजरोसपाने सुरु असलेल्या आरसीसी अनधिकृत बांधकाम याचे  छायाचित्र काढून शीळ-दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त जगताप याना व्हाट्सअप द्वारे माहिती दिली. केवळ दिखावा कारवाई करून तक्रारदाराच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले. तर प्रशासनाला न जुमानता आज त्याच इमारतीच्या पाचव्या माळ्याचे काम सुरु असल्याचे लेखी पत्र आयुक्तांना दिले आहे. मग लकी कंपाउंड सारख्या दुर्घटनाची पुनरावृत्ती का नाही होणार ? 
 
         -शरद पाटील (वार्ड-२९ मनसे शाखा अध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published.