मुंब्रा रेतीबंदरमध्ये  स्मशान उभारणार 50 वर्षानंंतर नागरिकांची गैरसोय दूर

मुंब्रा रेतीबंदरमध्ये  स्मशान उभारणार
50 वर्षानंंतर नागरिकांची गैरसोय दूर
मुंब्रा : प्रतिनिधी
गेली 50 वर्षे मुंबरा रेतीबंदर या भागात स्मशान नसल्यामुळे नागरिकांची मोठे हाल होत होते. ही समस्या आ. जितेंद्र आव्हाड यांनी मार्गी लावली आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे आता स्मशानभूमीची निर्मिती केली जाणार आहे.  शनिवारी या स्मशानभूमीच्या उभारणीसाठी आ. जितेंद्र आव्हाड, ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. 
मुंब्रा रेतीबंदर परिसरात गेल्या 50 वर्षांपासून स्मशानभूमीच नव्हती. त्यामुळे येथे एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास नागरिकांना प्रचंड पायपीट करुन मुंब्रा पोलीस ठाण्यामागील स्मशानभूमी गाठावी लागत होती. ही बाब आ. जितेंद्र आव्हाड यांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करुन ही स्मशानभूमी मंजूर करुन घेतली. या स्मशानभूमीसाठी 5 गुंठे जागा आरक्षित करण्यात आली असून दोन स्टँडच्या या स्मशानभूमीसाठी 35 लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.  या स्मशानभूमीच्या कामाच भूमिपुजन शनिवारी पार पडले. यावेळी ठामपाचे उपअभियंते खांडपेकर, शेंडगे,  कार्यकारी अभियंते गोसावी, नगरसेविका दिपाली भगत,  राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष बबलू शेमणा, समाजसेवक मोतिराम भगत, प्रभाग अध्यक्ष आप्पाराव हिलाल आदी मान्यवर उपस्थित होते.