ठाण्यात १ जानेवारीपासून क्लस्टरच्या बायोमेट्रीक सर्वेला सुरवात

ठाण्यात  १ जानेवारीपासून क्लस्टरच्या  बायोमेट्रीक सर्वेला सुरवात  

 
 
ठाणे : प्रतिनिधी 
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्राच्या क्लस्टरचे बायोमेट्रीक सर्वेक्षण १ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश ठाणे  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले असून ३० जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची अंतीम पात्रता यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
        दरम्यान क्लस्टरच्या कामाला गती मिळावी तसेच क्लस्टरसंबंधी प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याबाबत ५ विविध कक्ष स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णयही महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी आज क्लस्टर आढावा बैठकीत घेतला.कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्रांचा नागरी पुनरूत्थान आराखड्यांना मंजुरी प्राप्त झाली असून या योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता यादी निश्चित करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर १ जानेवारीपासून ते १५ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १५ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत त्याविषयीच्या हरकती स्वीकारण्यात येणार असून दिनांक २३ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत परिमंडळ उपायुक्त स्तरावर त्यांची सुनावणी होणार आहे. सदरची सुनावनी झाल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत अंतीम पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
    सदरची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जागा मालक व लार्भार्थी सदरची योजना कोणाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे याचा निर्णय घेतील. सदरचा निर्णय त्यांच्या स्तरावर न झाल्यास महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेचा अवलंब करून विकासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.दरम्यान सदर योजनेला गती मिळावी तसेच या योजनेच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या तक्रारींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ५ विविध कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे .