‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘भारतीय संस्कृतीचे पाश्‍चात्यीकरणापासून रक्षण करणे का आवश्यक’ हा शोधप्रबंध सादर !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘भारतीय संस्कृतीचे पाश्‍चात्यीकरणापासून रक्षण करणे का आवश्यक’ हा शोधप्रबंध सादर !

सात्त्विक भारतीय संस्कृती अंगिकारल्याने जग सात्त्विक बनेल !

कोलकाता – जागतिकीकरणामुळे भारतीय नागरिक मोठ्या संख्येने पाश्‍चात्त्य संस्कृती अंगिकारत आहेत. भारतियांना आपल्या परंपरा जुनाट आणि आधुनिक जगाशी न जुळणार्‍या वाटू लागल्या आहेत; मात्र आपल्या भारतीय रूढी-परंपरा त्याज्य लेखण्याआधी ‘त्या ठोस शास्त्रीय पायावर उभ्या असून आधुनिक रूढींऐवजी त्यांचे पालन करणे अधिक हितकारी आहे’, हे विवेकी दृष्टीने समजून घेणे आवश्यक आहे. तरच भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात येऊ शकेल. भारतीय संस्कृती ही सत्त्वगुण वृद्धी करणारी आहे, त्यामुळे सात्त्विक भारतीय संस्कृती अंगिकारल्याने जग सात्त्विक बनेल, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केले. त्यांनी ‘भारतीय संस्कृतीचे पाश्‍चात्यीकरणापासून रक्षण करणे का आवश्यक’, या विषयावर शोधनिबंध सादर केला. 7 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत कोलकाता येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल अ‍ॅन्ड इंटरडिसिप्लिनरी कॉन्फरन्स रिजन, कल्चर अ‍ॅन्ड मोरॅलिटी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सौ. मुंजाल बोलत होत्या. ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉस कल्चरल स्टडीज अ‍ॅन्ड अकॅडमिक एक्सेंज’ आणि ‘द सोसायटी फॉर इंडियन फिलॉसफी अ‍ॅन्ड रिलिजन’, हे या परिषदेचे आयोजक होते. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले, तर सौ. संदीप कौर मुंजाल आणि श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

सौ. मुंजाल पुढे म्हणाल्या की, श्रीमद्भगवद्गीतेच्या 14 व्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितले आहे की, सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी सृष्टी बनली असून या त्रिगुणांचा व्यक्ती, समाज आणि वातावरण यांवर थेट परिणाम होतो. जेव्हा समाजातील सात्त्विकता वाढते, तेव्हा सर्वत्र शांती आणि समृद्धी यांसह आध्यात्मिक उन्नती साध्य होते. याउलट जेव्हा रज-तम वाढते, तेव्हा त्याचा केवळ व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण समाजावर परिणाम होऊन विविध समस्या निर्माण होतात.

या शोधनिबंधात दैनंदिन जीवनातील 5 अंगांमध्ये पारंपरिक विरुद्ध पाश्‍चात्त्य रूढी यामध्ये व्यक्ती करत असलेल्या निवडींचा ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ आणि ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी’ ही आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि सूक्ष्म परिक्षण यांच्या आधारे करण्यात आलेला अभ्यास मांडण्यात आला. या 5 निवडी म्हणजे स्त्रियांची केशरचना, अलंकारांची नक्षी (डिझाइन), आहार, वस्त्रांचे रंग आणि सण. या अभ्यासातून पुढील निष्कर्ष लक्षात आले –

अ. केस मोकळे सोडणे किंवा ‘पोनीटेल’ पद्धतीने बांधणे यांपेक्षा आंबाडा हा अधिक सात्त्विक आहे.

आ. सोन्याच्या दोन हारांची तुलना केली असता सात्त्विक नक्षी असलेल्या हारातून अधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.

इ. मांसाहार ग्रहण केल्याने व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तसेच त्याच्यात मूलतः सकारात्मक ऊर्जा असल्यास ती नष्ट होते.

ई. पांढरा रंग सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करतो, तर काळ्या रंगातून तामसिक स्पंदने प्रक्षेपित होतात.

उ. गुढीपाडव्यासारखे भारतीय सण सात्त्विक, तर ‘31 डिसेंबरच्या रात्री नववर्षारंभ’ हा पाश्‍चात्त्य उत्सव तामसिक आहेत. भोगवाद हे पाश्‍चात्त्य उत्सवांमागील कारण असल्याने या पार्ट्यांमधील वर्तन अत्यंत तामसिक असते. याउलट गुढीपाडवा सर्वांत सात्त्विक वेळी (सकाळी) पूजन आणि नूतन वर्षासाठी ईश्‍वराचे आशीर्वाद मिळवणे, अशा पद्धतीने साजरा होतो.

दैनंदिन साधनेमुळे कालांतराने व्यक्तीमध्ये विविध वस्तू, कृती किंवा घटना यांतील स्पंदने ओळखण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे स्वतःसाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य, हे तो स्वतःच समजू शकतो. एकदा ही क्षमता निर्माण झाली की, बाह्य बौद्धिक स्पष्टीकरणाची आवश्यकता रहात नाही. सूक्ष्मातील स्पंदने ओळखता आल्यामुळे सात्त्विकतेवर आधारित भारतीय पारंपरिक रूढींचे पालन करण्याचे महत्त्व व्यक्तीला समजते. असे समाजाने सातत्याने सात्त्विक रूढींचे पालन केल्यास कालांतराने संपूर्ण विश्‍वच निश्‍चित सात्त्विक बनेल, असे सौ. मुंजाल यांनी सांगितले.