श्री अंबाबाई मंदिर कायदा प्रश्नी पाठपुरावा करणार – आ. प्रकाश आबिटकर

श्री अंबाबाई मंदिर कायदा प्रश्नी पाठपुरावा करणार – आ. प्रकाश आबिटकर
गारगोटी / प्रतिनिधी
पंढरपूर आणि शिर्डी देवस्थान पध्दती प्रमाणे अंबाबाई देवळातील विद्यमान पुजारी हटवून छ. शाहू महाराजांच्या वैदीक स्कूल मधील आणि सर्व जातीतले स्त्री पुरुष पुजारी नेमणूकीचा कायदा करावा, ही जन आंदोलनाची मागणी पुरोगामी महाराष्ट्राच्या आणि छ. शाहु महाराजांच्या विचारांना मुर्ताकार देणारी आहे. यामुळे जनतेच्या भावनेची मागणी हिवाळी अधिवेशनात लावून धरणार असून गृहराज्य मंत्री ना. रणजित पाटील यांच्याकडे पाठपूरावा करणार आहे, आसे आश्वासन आ. प्रकाशराव आबिटकर यांनी दिले.
जेष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई, मराठा सेवा दलाचे डॉ. राजीव चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड च्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी गारगोटी येथे आ. प्रकाश आबिटकर यांना श्री अंबाबाई मंदीर कायदा संदर्भात सुचना करणारे निवेदन देण्यासाठी भेट घेतली असता आ. आबिटकर बोलत होते. छत्रपतीनी श्री अंबाबाई मंदीर देखभाल खर्चासाठी व समाजात धार्मिक उत्सव करुन समाजाचे धर्म तत्त्वज्ञाना बद्दलचे प्रबोधन व्हावे या हेतूने पुजाऱ्यांना जमिनी दिल्या होत्या. पण त्या हेतूंची पुर्तता होत नसल्यामुळे या जमिनी कसणा ऱ्यां शेतकऱ्यांना मिळाव्यात, या शेतकऱ्यांच्या मागणीचा पाठपुरावा आपण गेली सहा महिने करत असल्याचे सांगून आ. आबिटकर म्हणाले, हा माझ्या मतदारसंघातील जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचे सांगितले. दारवाड, बारवे, कवळी कट्टी, नेसरी आदी सह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. आ. आबिटकर यांच्या या भूमिकेस शिष्ठमंडळानेही पाठिंबा दर्शवला.
श्री अंबाबाई मंदीर कायदा संदर्भात हे शिष्ठमंडळ लवकरच मंत्रीमहोदय ना. रणजित पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
फोटो – आ. आबिटकर याना निवेदन देताना डॉ सुभाष देसाई, डॉ चव्हाण, डॉ जयश्री चव्हाण, पत्रकार किशोर आबिटकर .