Breaking News

वसई विभागात आढळली ३८१ ठिकाणी वीजचोरी

२ लाख ५८ हजार युनिटची वीजचोरी उघड

वसई विभागात आढळली ३८१ ठिकाणी वीजचोरी

२ लाख ५८ हजार युनिटची वीजचोरी उघड

वसईमहावितरणच्या वसई विभागात वीज चोरट्यांविरुद्ध धडक व व्यापक मोहीम सुरु करण्यात आली आहे. ९ डिसेंबरपासून सुरु असलेल्या या मोहिमेत ६ हजार २८५ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली असून ३८१ ठिकाणची वीजचोरी उघड झाली. संबंधित वीज चोरट्यांविरुद्ध चोरीच्या देयकाची वसुली तसेच दंडात्मक व कायदेशीर कारवाई सुरु आहे.

वसई विभागातील आचोले, विरार पूर्व आणि पश्चिम, नालासोपारा पूर्व आणि पश्चिम, वसई रोड पूर्व व पश्चिम, वसई शहर तसेच वाडा उपविभागात ६ हजार २८५ वीज जोडण्या तपासण्यात आल्या. यात ४ हजार ८४६ घरगुती, १ हजार २६६ व्यावसायिक, १३२ औद्योगिक व ४१ इतर वीज जोडण्यांचा समावेश आहे. वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ नुसार २८५, कलम १२६ अन्वये ९१ तर इतर कलमानुसार ५ ठिकाणी वीजचोरी अथवा अनधिकृतपणे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. या सर्व प्रकरणांमध्ये सुमारे २ लाख ५८ हजार ३८४ युनिट विजेची व जवळपास ३० लाख ९१ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधितांना वीजचोरीचे देयक देण्यात आले असून हे बिल भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. विजचोरीचे देयक व दंडाच्या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे.

वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम नियमितपणे सुरु राहणार असून कारवाई टाळण्यासाठी सुलभतेने मिळणारी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंते, अधिकारी, अभियंते, जनमित्रांकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close