ठाणे

राजेंद्र देवळेकर एक झुंजार योद्धा – नरेश म्हस्के, महापौर ठाणे

राजेंद्र देवळेकर एक झुंजार योद्धा – नरेश म्हस्के, महापौर ठाणे

 

ठाणे , मुनीर खान : नुकतेच कल्याण चे माजी महापौर श्री. राजेंद्र देवळेकर यांचे दुर्दैवी निधन झाले आहे , कोरोना ह्या भयंकर रोगाशी त्यांची गेले 43 दिवस निकाराची झुंज सुरू होती पण शेवटी निर्दयी काळाने डाव साधला व कल्याणकरांच्या गळ्यातील ताईत व सर्व शिवसैनिकांचा आधार हिरावून नेला . देवळेकर यांच्या बद्दल बोलताना शब्द ही कमी पडतील असे त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते .
स्वर्गीय देवळेकर यांचे बालमित्र व प्रत्येक सुखादुखात सोबत असणारे , त्यांचा सुरवातीचा संघर्ष अगदी जवळून पाहणारे ठाणे मनपाचे महापौर श्री. नरेश गणपत म्हस्के यांनी महाराष्ट्र तेज न्युज शी बोलताना आपल्या दुखाःला वाट करून देत अश्रू पुर्ण नेत्रांनी जे मनोगत व्यक्त केले आहे ते पुढील प्रमाणे .

प्रिय मित्र,
राजेंद्र देवळेकर
कोरोनाने माझ्या जवळच्या मित्रावर घाला घातला

ठाण्याचा महापौर म्हणून दुर्देवाने रोज शहरातील नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करावी लागते आहे. त्याचे दु:ख आणि वेदना रोज मनाला होतात त्यातच आज माझ्या जवळच्या मित्रावर कोरोनाने घाला घातला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर, माजी स्थायी समिती सभापती, माजी सभागृह नेता राजेंद्र देवळेकर या माझ्या मित्राला आज श्रध्दांजली वाहताना मनाला अनंत वेदना होत आहेत. राजु माझा विद्यार्थी दशेपासून, भारतीय विद्यार्थी सेनेपासून आम्ही अगदी जवळचे मित्र.. ज्ञानसाधना कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिकलो.. त्यावेळी तो बाळकूमला रहायचा. मध्यवर्गीय कुटुंबातला हा तरूण.. आमचा दोघांचा संघर्ष सारखाच होता. शिवसेनेत कडवट शिवसैनिक ही त्याची ओळख. पुढे कल्याणमध्ये जावून त्याने राजकारणामध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान बनवले.. अत्यंत कष्ट्, आणि मेहनत आणि परिश्रमापर्यत तो कल्याणमध्ये विविध पदांपर्यत पोहचला. त्याच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये एकमेकांचे सहकारी म्हणून आम्ही करत होतो. प्रत्येक गोष्टीचे आम्ही एकमेकांचे साक्षीदारच. आमच्यावर अनेक प्रसंग आले, मात्र कधीही आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो नाही. आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्लेशकारक प्रसंगात एकमेकांची समजूत घालणारे आपण मित्र .शिवसेना पक्षाचे काम जिल्हयात असो की, महाराष्ट्रात असो, आम्ही सोबतच राहून काम केले आहे. एकमेकांच्या सुखात सहभागी होतोच पण दु:खातही कायम सोबत होतो.
कोरोनाकाळ सुरू झाल्यापासूनच कल्याणमध्ये तू प्रचंड मेहनत घेतली. हॉस्पिटल उभारण्यापासून ते नागरिकांना मदत करण्यामध्ये तुझा महत्वपूर्ण वाटा आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तू रुग्णालयात देखील या आजाराशी झुंज देत होतास, मात्र 43 दिवसांची ही झुंज अपयशी ठरली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सुरूवातीला आपले जे बोलणे झाले ते शेवटचे बोलणे होईल असे कधीच वाटले नव्हते. आज तुझ्या निधनाची बातमी कानावर आली आणि त्या बातमीवर विश्वासच बसेना.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व, कट्टर शिवसैनिक हरपला. कल्याणमध्ये पक्ष वाढण्यासाठी तू जी मेहनत घेतलीस ती आम्ही पाहिलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर, स्थायी समिती सभापती अशी अनेक पदे तू भूषविली. अनेक इच्छा होत्या, अनेक स्वप्ने होती, ती स्वप्ने तू अर्धवट सोडून गेलास, अगदी शेवट्च्या क्षणापर्यत पक्षासाठी काम करीत राहिलास. मात्र नियतीने तुला आमच्यातून हिरावून नेले. तुझ्या जाण्याने तुझ्या परिवारासह आम्हा सर्वांचे देखील खूप मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येकाला तुझा अभिमान वाटावा असे कार्य तुझ्या हातून घडले आहे. आज कल्याण शहराचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. तू जरी आज आम्हाला सोडून गेला असलास तरी तुझ्या कामाने तू कायमच माझ्याच नव्हे तर संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांच्या स्मरणात राहणार आहेस.
आज मला एवढया जवळच्या मित्राला श्रध्दांजली वाहताना  शब्द सुचत नाहीत . कल्पना ही केली नव्हती ही वेळ येईल.
मित्रा, आम्हाला पोरकं केलस.. अंदाजच आला नाही. आम्हाला.. तू योध्दा होतास पण असा कसा हरलास?
नरेश गणपत म्हस्के,
महापौर, ठाणे.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close