नाशिक

हास्य आणि धीरगंभीर भावमुद्रीत चेहऱ्यामागे दडलंय काय ?

हास्य आणि धीरगंभीर भावमुद्रीत चेहऱ्यामागे दडलंय काय ?

 

कुमार कडलग,नाशिक : माणसाचा चेहरा बोलतो, फक्त ती वाचण्याची कुवत असायला हवी. चेहऱ्यावर असणारे भाव खुप सांगून जातात.अर्थात काही माणसांच्या चेहऱ्यावर असलेले भाव अनाकलनीय असतात.अनेकदा वाचणाऱ्याला संभ्रमीत करतात.अशा माणसांची पारख व्हायला त्यांच्या कर्तृत्वावर नजर टाकावी लागते.नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या संदर्भातही हे गृहीतक खरे ठरतांना दिसते. चेहऱ्यावर सतत असलेले स्मीत आणि त्याचवेळी दिसणारी धीरगंभीर भावमुद्रा हा माणूस वाचतांना संभ्रम निर्माण करते.माञ खोलात शिरले की समजते.समोर उभे ठाकलेल्या असंख्य आव्हानांना सामोरे जात धीराने मात करून गंभीर परिस्थितीतही मार्ग शोधता येतो.हेच या चेहऱ्यामागे दडलंय.

इगतपुरीच्या स्काय ताज आणि स्काय लगुन व्हिला या खासगी बंगल्यावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामिण पोलीसांनी टाकलेला छापा आज सर्वच माध्यमांवर चर्चेत आहे. प्रथमदर्शनी हा छापा एक कायदेशीर कारवाई दिसत असली तरी यामागे अनेक तरंग दडलेले आहेत.अशी कारवाई करणे ही पोलीसांची जबाबदारी आहे. या धारणेतून या कारवाईकडे पाहीले तर कदाचीत पोलीसांच्या या मोहीमेचे विशेष कौतूक वाटणारही नाही.तरीही जिल्ह्यात या सारख्या सुरू असलेल्या अनेक कारवायांचा विचार केला तर पोलीसींग म्हणजे काय? याचा उलगडा व्हायला वेळ लागणार नाही. ग्रामिण पोलीसांच्या कार्यक्षेञाचा विचार केला तर ठाणे, अहमदनगर,जळगाव ,धुळे,शेजारच्या गुजरातमधील डांग अशा पाच जिल्ह्यांच्या सीमेपर्यत आणि मध्यप्रदेश गुजरात या दोन राज्यांची सीमा असे प्रचंड कार्यक्षेञ असलेल्या परिक्षेञात पोलिसींग राबवणे आव्हानात्मक आहे.याचा अनुभव यापुर्वी अनेक पोलीस अधिक्षकांनी घेतला आहे.सीमावर्ती भागातील माफीया, त्यांना असलेला राजाश्रय, सोबत जिल्ह्यातील राजकारण्यांचा वरदहस्त असलेले बेकायदेशीर मंडळींचे नाना उद्योग, अवैध धंद्यांचे जाळे, वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी चिकटून असलेले कर्मचारी अशा आव्हानांशी अनेक पोलीस अधिक्षकांनी सामना केला तर काहींनी सपशेल शरणागती पत्करून वातावरणात मिसळून गेले. या परिस्थितीला नियंञणात आणण्याचा प्रयत्न करून जिल्ह्यावर पोलिसींगचे प्रस्थापीत करण्याचे काम हाती घेतले असतांना कोरोना महामारीने खोडा घातला आणि तत्कालीन अधिक्षक डाॕ.आरती सिंह यांची बदली झाली.
आरती सिंह यांच्यानंतर एक उमदा तरूण आयपीएस सचिन पाटील यांना या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महाराष्ट्र शासनाने जबाबदारी सोपवली.साधारण १९ किंवा २० सप्टेंबर २०२० रोजी सचिन पाटील यांनी पोलीस अधिक्षक म्हणून पदभार स्विकारला. तत्पूर्वी एका स्थानिक वृत्त वाहिनीसह दै.लोकमंथनच्या माध्यमातून आम्ही या जिल्ह्याची एकूण पोलिसींगसमोर असलेली आव्हनं त्यांच्यसमोर ठेवली होती, मराठवाडा, ठाणे ,मुंबई आदी ठिकाणी या तरूण आयपीएस अधिकाऱ्याने दाखवलेले कर्तृत्व पाहील्यानंतर आमच्यासह अवघ्या जिल्ह्याच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. डाॕ.निखील गुप्ता,स्व,हिमांशू राॕय,डाॕ.रविंद्र कुमार सिंघल,डाॕ.आरती सिंह या परंपरेतील अधिक्षक या जिल्ह्याला लाभला अशीच तत्कालीन धारणा होती.

अवघे नऊ महिने झालेत सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारून. या अल्पकालावधीतच पोलीसींगचा खरा अर्थ नाशिककरांना समजावण्यात ते कमालीचे यशस्वी ठरलेत. जुगार ,दारू, मटका, गुटखा अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करणे म्हणजे पोलीसींग आहे का? ही समाजाला लागलेली किड आहे हे मान्य केले तरी समाजाला हवी म्हणून ती आचंद्र सुर्य सपंणार नाही. हे वास्तव मान्य करून पोलीसींगचे मुल्यपान व्हायला हवे. या मुल्यमापनात सचिन पाटील अन्य कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यापेक्षा एक पाऊल सरस ठरतात असे आमचे निरिक्षण आहे. इतरांनी ते मान्य करावे असा आमचा आग्रह नाही. माञ विवेक जागा असावा एव्हढीच अपेक्षा.

सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून वर उल्लेखीत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतांना विशेषतः गुटखा आणि अवैध दारू यावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे निदर्शनास येते. याशिवाय आजवर एकाही पोलीस अधिक्षकांनी लक्षात न घेतलेला शेतकरी आणि बेरोजगारांची फसवणूक, सचिन पाटील यांनी आपल्या अजेंड्यावर अग्रक्रमाने घेतलेली दिसते. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची २० कोटीहून अधिक रक्कम परत मिळवून देत असतांनाच तितक्याच किंबहूना त्याहून अधिक रकमेचा गुटखा हस्तगत करून आंतरराज्य माफीयांच्या मुसक्या बांधल्या आहेत.

दुसऱ्या बाजुला हुक्का पार्लर हाही त्यांचा प्राधान्यक्रम राहीला आहे. विशेषतः पोलीस आयुक्तालयाच्या बगलेत ग्रामिण हद्दीतील तरूण तरूणींना व्यसनाधीन बनवणाऱ्या या अड्ड्यांवर वारंवार छापामारी करून नाकीनऊ आणले आहे. पोलीस अधिक्षकांच्या कामाचा लेखाजोखा मांडतांना रोलेट या आॕनलाईन जुगाराचा उल्लेख टाळता येणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून रोलेट जुगाराने कित्येक प्रपंच उध्वस्त केले, अनेकांनी आत्महत्या केल्या. नाशिक शहरात अनेक गुन्हे दाखल झाले. माञ शहर पोलीसांनी जाणते अजाणतेपणे दुर्लक्ष केले. रोलेट बादशहाचे वास्तव्य शहरात, सारा कारभार शहरातून सुरू आहे. गुन्हेही शहरात दाखल. तरीही शहर पोलीस स्वारस्य दाखवत नव्हते. रोलेट बाद”शहाच्या” दुर्दैवाने ञंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि वासे फिरले. जंग जंग पछाडल्यानंतर या बाद”शहाला” शहराच्या हद्दीतच जेरबंद करण्याचे धाडस पोलीस अधिक्षकांनी दाखवले. तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. कायदेशीर पाहूणचार घेऊन हा संशयीत जामीनावर असला तरी त्याच्या पापाची फळं त्याच्या पदरात पडावीत यासाठी पोलीस अधिक्षक कटीबध्द आहेत.

या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेशी थेट संबंध असलेली बाब म्हणजे शांतता.या शांततेला दंश करणारे जनावर म्हणजे सामाजिक सलोखा. जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही याविषयी पोलीस अधिक्षक पहिल्या दिवसापासून सजग दिसतात. मालेगावसारख्या संवेदनशील शहराची शांतता अबाधीत ठेवण्यातही त्यांना यश आले आहे. आठवड्यातील दोन दिवस मालेगावमध्ये तळ ठोकून असणारे सचिन पाटील पहिले पोलीस अधिक्षक असावेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाण्याला महिन्यातून एक किंवा दोन वेळा भेट देऊन स्थानिक कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेत असतांना स्थानिक पोलीस ठाण्याच्या आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन कुटूंब प्रमुखाची जबाबदारीही पार पाडतात. पोलीस खात्यात चुकीला माफी नाही हे खरे असले तरी देहबोलीतून प्रसवणाऱ्या भावना पारखून चुकीची कारणमिमांसा करीत किरकोळ चुकीला दंडीत न करता पोलीसातील माणूस मारला जाणार नाही याचीही काळजी घेऊन नगण्य चुकीला उदार मनाने माफ करणारे पोलीस अधिक्षक म्हणूनच ग्रामिण पोलीसांत आदर मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. कोरोना विषाणूपासून समाजाचे रक्षण करतांना अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी बाधीत झाले.काहींना आपला जीवही गमवावा लागला.हा कटू क्षण अन्य कुणाही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला सोसावा लागू नये म्हणून विशेष काळजी घेत असताना शंभर टक्के लसीकरण ही मोहीम पुर्णत्वासही नेली.

एकूणच पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी ग्रामिण पोलीसांचे पालकत्व स्वीकारल्यानंतर पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवित असतानाच सकारात्मक दृष्टीकोनातून कायदा सुव्यवस्था राबविण्याचा दृष्टीकोनही वाढीस लावला. त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात सामुहीक हिंसाचाराच्या घटनांचा आलेख कमी होत असतानाच माफीयागीरीलाही वेसण घालून समाजहिताचे लचके तोडणाऱ्या प्रवृत्तींनाही चाप बसला आहे.व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच प्रवृत्ती हे वास्तव ठाऊक असल्याने हेतूची उकल करून येणारी प्रत्येक छोटी माहीतीही नजरेआड न करता तिला परिणात्मक अंमलबजावणीपर्यंत नेण्याचे कसब पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी गेल्या सात महिन्यात दाखवल्याने शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याची पोलीसिंग सरस ठरली आहे.
पोलीस आणि अवैध कारभार यांचा तसा जवळचा संबंध.संबंध असला, नसला तरीही कुठल्याही अवैध बाबीसाठी खाकी वर्दीलाच जबाबदार ठरवून पोलीसांना लक्ष्य करण्याची फॕशन अलिकडच्या काळात विशेषतः समाज माध्यमांच्या भाऊगर्दीत भलतीच लोकप्रीय ठरली आहे. या फॕशनवरही पोलीस अधिक्षकांनी लिलया मात करून कर्तव्य हेच लक्ष्य ठेवल्याने कायदा सुव्यवस्था समाज माध्यमांच्या नजरेत अबाधीत नसली तरी ग्रामिण पोलीसांकडे बोट दाखवण्याची हिंमत व्हावी इथपर्यंत ढासळू माञ नक्कीच दिली नाही. निवृत्त विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी नाशिक परिक्षेञाचा कारभार स्वीकारतांना शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आणि गुटखा माफीयांना धडा शिकवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम अन्य जिल्ह्यांमध्ये थंडावली असली तरी त्यांच्या पश्चातही नाशिकच्या पोलीस अधिक्षकांनी अविरत सुरू ठेवली आहे. रेती माफीया आणि चिंधीचोर अवैध धंदे चालकांना मुसके बांधण्याचे काम त्यांनी आता हाती घेतले आहे. याची अनुभूती मालेगावसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पडत असलेल्या छापासञातून येऊ लागली आहे. शेवटी प्रत्येकाला काही मर्यादा असतात. काम करतांना एखाद दुसरी चुकही होऊ शकते, माञ ती निदर्शनास आणून दिल्यानंतर सुधारणा करण्याइतपत मोठेपणा असणारे अधिकारी पोलीस खात्यात दुर्मीळ असले तरी नाशिककरांच्या भाग्यात असे अधिकारी लाभणेही दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close